+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Introduction in Marathi

प्रिय बंधू आणि भगिनींनो

नमस्कार!

ब्रह्मविद्या हे योग आणि तत्त्वज्ञानाचे एक प्राचीन शास्त्र आहे. जिला सर्वसाधारणतः आपण देव, परमेश्वर, भगवान असे म्हणतो, त्या सर्वोच्च वस्तूला पुरातन आध्यात्मिक वाङ्मयात ब्रह्म ही संज्ञा वापरली आहे.

म्हणूनच ब्रह्मविद्या हे असे शास्त्र आहे की, ज्याच्या साधनेने मनुष्याला ब्रह्म किंवा परमेश्वराचे ज्ञान होऊ शकते.

सर्व धर्मांमध्ये एक तत्त्व आवर्जून सांगितले जाते, ते म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये दैवी अंश आहे आणि ह्या दैवी अंशाच्या आधारावर, या दैवी प्रज्ञेच्या बळावर मानवी जीवन चालू असते. मनुष्य दिसतो त्यापेक्षा तो फारच श्रेष्ठ व उच्च आहे.

ब्रह्मविद्येची साधना हा आपल्यातील दैवी अंश फुलवण्याचा, आपले सत्य स्वरूप ओळखण्याचा एक मार्ग आहे. ब्रह्मविद्येच्या पद्धतींच्या सरावाने शारीरिक व मानसिक पातळ्यांवर मनुष्य आरोग्यसंपन्न होऊन आध्यात्मिक मार्गाची वाटचाल सुरू करतो. या पद्धतींच्या अभ्यासाने आपल्या जीवनातील सर्व उणिवा, अपयश व कुविचार मुळापासून नाहीसे होतील व खरा आनंद, सुबत्ता व सुयश यांनी आपले जीवन भरून जाईल.

मानवी आयुष्यात अल्पजीवित्व, आजारपण, वृद्धत्व, गरिबी, अपयश या गोष्टी अटळ आहेत असे वाटणे ही फार मोठी चूक आहे. हा आपला भ्रम आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये जो दैवी अंश आहे, जी दैवी शक्ती आहे त्या शक्तीला अशक्य असे काहीच नाही. या शक्तीच्या साहाय्याने आपल्याला आपल्या जीवनातील सर्व उणिवा भरून काढता येतील. या अभ्यासक्रमामध्ये ज्या पद्धती दिलेल्या आहेत, त्यांच्या मदतीने दैवी अंश ओळखण्यास व त्याचे स्वरूप जाणण्यास साहाय्य होईल. तसेच आपल्यातील या दैवी शक्तीचा रोजच्या जीवनात कसा उपयोग करायचा हेदेखील लक्षात येईल.

ब्रह्मविद्येचा ‘हा’ अभ्यासक्रम म्हणजेच श्रेष्ठ ज्ञानी पुरुषांनी शेकडो वर्षे केलेल्या संशोधनाचे सार आहे; आणि तुमच्यामधील ह्या दिव्य वस्तूची, ह्या परमात्म्याची, ह्या भगवंताची तुम्हांला ओळख करून देणे, हेच ब्रह्मविद्येचे श्रेष्ठ उद्दिष्ट आहे. सामान्य जनांपासून दूर हिमालयात विशेषतः तिबेट प्रांतात राहणाऱया ज्ञानी पुरुषांना ह्या दैवी शक्तीचा वापर करण्याच्या पद्धती गेली हजारो वर्षे ज्ञात आहेत. अखंड गुरूशिष्य परंपरेने या पद्धती आज आपल्यापर्यंत या अभ्यासक्रमाच्या रूपाने आल्या आहेत. आजसुद्धा या पद्धती मानवी जीवन सुधारण्यास, अधिक विकसित करण्यास अत्यंत उपयुक्त आहेत.

प्रकृती उत्तम राखण्यासाठी, प्रबळ मनःशक्ती संपादन करण्यासाठी तसेच व्यावहारिक जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी या पद्धतींचा उपयोग आपल्याला अत्यंत बिनचूकपणे करता येतो. त्यासाठी ह्या पद्धतींचा अभ्यास करण्याचे व त्यांतील तत्त्वे व नियम आपल्या आयुष्यात उतरवण्याचे कष्ट तुम्ही घेतले पाहिजेत.

ह्या दिव्य वस्तूचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या आजवरच्या जीवनात तुम्ही काही केले आहे का?

आध्यात्मिक श्वसनप्रकार व ध्यान ही ब्रह्मविद्या साधनेची दोन महत्त्वाची अंगे आहेत. श्वसन आणि विचार हे जीवनाचे असे दोन मूलभूत घटक आहेत की, ज्यांवर जीवन आधारलेले आहे. ह्या दोन्हींशिवाय आपण जीवनाचा विचार करूच शकत नाही. त्यामुळेच जीवनाचे हे दोन घटक सुदृढ व बलशाली करण्यावर ब्रह्मविद्येच्या साधनेत भर दिला जातो. श्वसन आणि विचार सुधारल्याने साहजिकच त्याचा परिणाम शरीर आणि मन यांच्या वाढलेल्या आरोग्यात दिसून येतो. शिवाय हे जीवनाचे स्वाभाविक घटक असल्याने एकाच प्रकारच्या सरावाने साधकाला जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे फायदा होतो. ह्या एकाच साधनेने सर्दी,

दमा (आस्थमा), सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि इतरही वेगवेगळे विकार बरे होऊ शकतात.

आध्यात्मिक श्वसन प्रकारांच्या नियमित सरावाने फुप्फुसांची क्षमता वाढते. श्वास म्हणजे हवा व प्राणवायू एवढेच आपल्याला शाळेपासून माहीत असते. श्वासाबरोबर आपण ‘प्राण’ ही सूक्ष्म अविनाशी जीवनशक्तीदेखील शरीरात घेत असतो ह्याची आपल्याला जाणीवच नसते. शिवाय श्वास फुकट मिळत असल्याने व तो आपोआपच चालत असल्याने त्याची खरी किंमंत आपल्याला कळत नाही व तो आपण गृहीत धरून चालतो. ब्रह्मविद्या आपल्याला ह्या जीवनदायक प्राणाबाबत शिकवते. सरावाने आपल्यातील जीवनशक्तीशी, ह्या ‘प्राणाशी’ आपली ओळख होते. तीन – चार महिन्यांच्या सरावात आपल्या श्वसनात बदल होतो, सुधारणा होते व दिवसभर ताजेतवाने, उत्साही व जोमदार वाटायला लागते. शारीरिक पातळीवर प्राण आपल्याला निरोगी ठेवतो, मानसिक पातळीवर प्राण आपल्याला उत्साही ठेवतो, आध्यात्मिक पातळीवर प्राण आपल्याला अनिर्वाच्य शांततेत व आनंदात घेऊन जातो. खरोखरंच, आपल्या दोन नाकपुड्या म्हणजे स्वर्गाची द्वारे आहेत!

‘ध्यान’ हे ब्रह्मविद्येच्या साधनेचे दुसरे अंग आहे. ध्यानाबाबत अनेक गैरसमजुती बहुसंख्य लोकांच्या मनात असतात व त्यांना वाटते की, ‘ध्यान’ हे आपले काम नाही. ब्रह्मविद्येतील ध्यानाच्या पद्धती म्हणजे साधे, सोपे व सुलभ मानसिक व्यायामप्रकार आहेत. श्वासाप्रमाणेच विचारही सहज प्राप्त असल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यानाच्या ह्या मानसिक व्यायामाने आपले विचार शुद्ध होऊ लागतात. अनेक जुन्या नकारात्मक स्मृती कमकुवत होतात. मनोबल वाढत जाते. योग्य विचारांनी मन आरोग्यसंपन्न झाल्याने असा मनुष्य नेहमी आनंदी, उत्साही व परोपकारी होतो.

आपल्या जीवनास कारणीभूत असणाऱया ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजेच आपला ‘श्र्वास’ आणि आपला ‘विचार’ आपण जन्मापासून वापरत आहोत; परंतु या गोष्टी कशा वापराव्यात हे आपल्याला कोणीही शिकवलेले नाही. नेमके हेच आपण या अभ्यासक्रमात शिकणार आहोत.

ब्रह्मविद्येच्या ह्या सुलभ पद्धतींचा सराव व अभ्यास कुणीही करू शकतो. आजच्या विज्ञान युगात आपण बाह्य परिस्थितीस, जीवनातील चढाओढीस, प्रदूषित वातावरणास दोष देतो व आपली जबाबदारी टाळतो.

परंतु ब्रह्मविद्येच्या साधनेने अशा परिस्थितीतही आपण आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवू शकतो. ब्रह्मविद्येच्या साधनेने आजवर अनेक साधकांनी वेगवेगळ्या आजारांवर विजय प्राप्त करून आपले जीवन निरोगी केले आहे. तरीही ब्रह्मविद्या हे काही एखादे औषध नाही. ब्रह्मविद्या हा यशस्वी जीवनाचा निश्चित मार्ग आहे. बालवयात किंवा तरुणपणी या साधनेचा अवलंब केल्यास जीवन यशस्वी व भविष्य उज्ज्वल होऊ शकते.

वरील सर्व विधाने तुम्हांला अतिशय अद्भुत वाटण्याची शक्यता आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा स्वतःच्या जीवनात उपयेग करत नाही, तोपर्यंत तुम्हांला या विधानांची सत्यता पटणार नाही व त्याबद्दल दृढ विश्वासदेखील होणार नाही. साधकांना ह्या मार्गाने टप्प्याटप्प्याने पुढे नेण्यासाठी ब्रह्मविद्येचे खालील चार पातळ्यांचे वर्ग ब्रह्मविद्या साधक संघामार्फत चालवले जातातः

१) बालवर्ग – ७ आठवडे १० ते १८ वर्षे या वयोगटासाठी.

२) प्राथमिक – अ) २२ आठवडे (१८ वर्षांपुढील सर्वांसाठी.)

किंवा

ब) ५ दिवसांचे निवासी शिबिर (१८ वर्षांपुढील सर्वांसाठी.)

३) प्रगत – १०४ आठवडे – केवळ प्राथमिक अभ्यास पूर्ण केलेल्या साधकांसाठी.

४) प्रदीपक – ९६ आठवडे – केवळ प्रगत पूर्ण केलेल्या साधकांनाच योग्यता पाहून प्रवेश दिला जातो.

प्राथमिक अभ्यासक्रमाचे वर्ग, आठवड्यातून ठराविक वारी दीड तास घेतले जातात. वर्गात शिकवल्या जाणाऱया विषयाची छापील पुस्तिका दिली जाते. प्राथमिक अभ्यासक्रमात शिकवले जाणारे सर्व आध्यात्मिक श्वसनप्रकार करण्यास सुमारे ६० मिनिटे लागतात व ध्यानाच्या सर्व पद्धतींचा सराव करण्यासाठी साधारण ६० मिनिटे लागतात. अर्थातच सुरुवातीपासून एवढा वेळ द्यावा लागत नाही. साधकाने २२ आठवड्यांच्या कालावधीत हळूहळू साधनेचा वेळ वाढवायचा असतो. प्रत्येक जण आपआपल्या आवडीप्रमाणे व सवडीप्रमाणे साधनेसाठी वेळ देऊ शकतो, परंतु कमीत कमी २० मिनिटे श्वसनप्रकारांसाठी व २० मिनिटे ध्यानासाठी देणे

आवश्यक आहे. अर्थातच सरावाला अधिक वेळ दिल्यास अधिक उत्तम परिणाम दिसून येईल.

आठवड्यात एकदा असा २२ आठवडे घेतला जाणारा प्राथमिक अभ्यासक्रम ५ दिवसांच्या निवासी शिबिरात करण्याची सोय उपलब्ध आहे. ज्यांना २२ आठवड्यांच्या वर्गास येणे शक्य नसते त्यांनाही या विद्येचा लाभ घेता यावा म्हणून हा उपक्रम आहे. जरी ५ दिवसात सर्व पद्धती शिकून झाल्या तरीही सर्व साधना एकदम सुरू करायची नसते. शिबिरानंतर घरी एकेका पाठाचा अभ्यास करून प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार हळूहळू साधना वाढवायची असते.

ब्रह्मविद्येचा संक्षिप्त इतिहासः सुमारे १२०० वर्षांपूर्वी भारतात नालंदा येथे एक जगप्रसिद्ध विश्वविद्यालय होते. श्रेष्ठ योगी व तांत्रिक गुरू पद्मसंभव हे ह्या विद्यापीठातील योग आणि तत्त्वज्ञान विभागांचे प्रमुख होते. नालंदा विद्यापीठाचा होणारा नाश दूरदृष्टीने पाहून गुरू पद्मसंभवांनी तिबेटमध्ये आपला आश्रम स्थापन केला. पुढे अखंड गुरूशिष्य परंपरेने ह्या पद्धती तिबेटमधील आश्रमात शिकवल्या जात होत्या.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस एडविन जॉन डिंगल (गुरू डिंग ले मी) हे इंग्रज गृहस्थ तिबेटमध्ये जाऊन ही विद्या शिकले. पुढे ह्या पद्धतींचा त्यांनी जगभर प्रसार केला व सुमारे २,१६,००० साधकांना या पद्धतींचे शिक्षण दिले. गुरू डिंग ले मी यांचे शिष्य गुरू ज्योतिर्मयानंद यांनी १९७ ७ साली ब्रह्मविद्येचे वर्ग भारतात (मुंबईत) सुरू केले.

ब्रह्मविद्या साधक संघाची स्थापना १९९७ साली झाली. ब्रह्मविद्या साधक संघ, हा एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे व ब्रह्मविद्येचे हे अमूल्य ज्ञान मानव जातीच्या कल्याणासाठी प्रथम अखिल महाराष्ट्रात व नंतर संपूर्ण देशात व जगात पसरविणे हेच संघाचे मुख्य ध्येय आहे.

ज्यांना २२ आठवड्यांचा वर्ग किंवा निवासी शिबिर करणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी ‘पत्रद्वारा अभ्यासाची’ सोय आहे. पत्रद्वारा अभ्यासक्रमात पाठ दर आठवड्याला एक याप्रमाणे टपालाने पाठवले जातात. साधकाने पाठ वाचून त्याप्रमाणे सराव करायचा असतो. काही शंका असल्यास फोनवर किंवा पत्राद्वारे त्यांचे समाधान केले जाते.

Spread the light!
Show Buttons
Hide Buttons

     2018 © Copyrights : Brahmavidya Sadhak Sangh : A Unique yoga system of spiritual breathing exercises and meditation.